माझा प्रवास भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात – शुभांशू शुक्ला

0

– देशवासीयांना उद्देशून पाठवला पहिला संदेश

नवी दिल्ली : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे त्यांच्या तीन इतर सहकाऱ्यांसह फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत.सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर ते प्रवास करत असलेलं ड्रॅगन हे अंतराळ यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी देशवासीयांना उद्देशून एक संदेश पाठवला आहे. शुभांशू शुक्ला या संदेशमध्ये म्हणाले की, नमस्कार, माझ्या देशवासियांनो. काय सुंदर प्रवास आहे हा. ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलो आहोत. यावेळी आम्ही ७.५ किमी प्रतितास वेगाने पृथ्वीच्या चहुबाजूला फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. जो मला सांगतोय की, मी एकटा नाही आहे. मी तुम्हा सर्वांसोबत आहे.

ते पुढे म्हणाले की, माझा हा प्रवास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने जाणारा प्रवास नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनीही या प्रवासात सहप्रवासी बनावे, अशी माझी इच्छा आहे. तुम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुगली पाहिजे. या आपण सर्वांनी मिळून भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात करूया. जय हिंद, जय भारत!

शुभांशू शुक्ला यांचं अंतराळ यान अंतराळ स्थानकाच्या दिशेने यशस्वीरीत्या रवाना झाल्यानंतर भारतीय हवाई दलानेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आकाशाला गवसणी घालण्यापासून ताऱ्यांना हात लावण्यापर्यंत, भारतीय हवाई दलाच्या वीराचा अदम्य भावनेने प्रेरित असा एक प्रवास, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ऑक्सीओम-४ मोहिमेंतर्गत इतर ३ अंतराळवीरांसह अंतराळात झेप घेतली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन इथून शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना घेऊन फाल्कन ९ रॉकेट आणि ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकाकडे रवाना झालं आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech