मुंबई : हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सना खानच्या आईचं निधन झालं आहे. सनाच्या आई सईदा यांनी मंगळवारी (दि.२४) जगाचा निरोप घेतला. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत ही दु: खद बातमी शेअर केली आहे. सनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आईच्या निधनासंदर्भात भावुक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने माहिती दिली आहे. त्यामध्ये तिने लिहिलंय की,’इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैही राजिऊन. माझी प्रिय आई सईदा अल्लाहकडे परतली. सकाळी ०९.४५ वाजता ओशिवरा कब्रस्तानमध्ये ईशाच्या नमाजानंतर नमाज-ए-जनाजा अदा केली जाईल. माझ्या आईसाठी प्रार्थना करा.’ अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. माहितीनुसार, सना खानची आई सईदा खान मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, सनाच्या यशामागे आईचा हात असल्याचा उल्लेख तिने अनेकदा केला आहे.
एकेकाळी टीव्ही आणि चित्रपट जगताचा भाग असलेली सना खान आता लाईमलाईटपासून दूर गेली आहे. सना खान बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय तिने तमिळ-तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे. तसंच सना खान हे नाव रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-६’ मुळे खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचलं. परंतु २०२०मध्ये तिने अचानक सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.