इस्लामाबाद : तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान म्हणजेच टीटीपीच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करातील मेजर मुईझ अब्बास शाहचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाक लष्करातील लान्स नाईक जिब्रानही मारला गेला आहे. मेजर मुईझ अब्बासने २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केली होती.
अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानमध्ये कोसळले आणि ते जखमी झाले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मेजर मुईझने त्यांच्या अटकेचा दावा करून बातम्यांमध्ये स्थान मिळवले होते. पण पाकिस्तानला भारतासमोर झुकावे लागले आणि विंग कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात परत पाठवावे लागले होते. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार सोमवारी दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थातच टीटीपीसोबत झालेल्या चकमकीत मेजर मोईझ अब्बास मारला गेला आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा खुर्रम येथे टीटीपीने पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बाससह दोन पाकिस्तानी लष्करी अधिकारी ठार झाले आहेत.