इस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत.यानंतर पाकिस्तान सरकारने भारतासोबत संबंध सुधारण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र यापुढे दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होणार, असा पवित्रा भारताने घेतला आहे. अशातच आता, पाकिस्तानातील शेहबाज सरकारने सौदी अरेबियाकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ हे भारताशी चर्चा करुन दहशतवाद, पाकव्याप्त काश्मीर आणि द्विपक्षीय व्यापाराचे प्रश्न सोडवू इच्छितात. यासाठी त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अब्दुलअजीज अल सौद यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शाहबाज शरीफ यांनी मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवर चर्चा केली, या दरम्यान त्यांनी पीओके – सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवाद यावर भारताशी बोलण्यास तयार असल्याचे सांगितले.
जम्मू- काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना हाकालून देणे, अटारी वाघा सीमा बंद करणे, पाकिस्तानींची व्हिसा सवलत थांबवणे, पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, सिंधू पाणी करार स्थगित करणे. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद आणि POK चा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही.
दरम्यान, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी ओआयसीमधील ५७ मुस्लिम देशांसमोर सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. कोणत्याही देशाने पाकिस्तानच्या मागणीला गांभीर्याने घेतले नाही.अशा परिस्थितीत आता पाकिस्तानने सौदी अरेबियाकडे मदतीची याचना केली आहे. यावर अद्याप भारत सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.