आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी

0

सोलापूर : आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडुन आतापर्यंत १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून ८ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.राज्य शासनाने दिलेल्या १५ कोटीच्या निधीतून गरज असेल त्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मुरुमीकरण, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही वारकर्‍यांच्या आरोग्याची सुविधेसाठी निधी खर्च करण्यात येत आहे. मानाच्या पालख्यासमवेत ६ हजार २५० मोबाईल टायलेट असणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशीच्या दिवशी एकाचवेळी पंढरपूरात गर्दी असणार असल्याने पंढरपूरात कायमस्वरुपी ४ हजार ५०० मोबाईल टायलेटची सुविधा यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्यामुळे टॉयलेट परिसरात चिखल होऊ नये यासाठी मुरुमीकरणही करण्यात येत आहे. वारकर्‍यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक उपचाराचे किट देण्यात येत आहेत. याशिवाय अडीच हजार आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी डॉक्टरांचे सहकार्य यासाठी घेण्यात येत आहे. १४३ बाईक अ‍ॅम्बुलन्स सुविधा तैनात करण्यात आली आहे. तर २८ रुग्णवाहिका पंढरपूरात असणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. पंढरपूरात गर्दी असलेल्या १३ ठिकाणी चेंगराचेंगरीची शक्यता गृहित धरुन याठिकाणी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे याशिवाय वारकर्यांना सुरक्षित गैस व वीज पुरवठा करण्यासाठीही स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहेत सुरक्षित गॅस व वीज पुरवठा असलेल्या ठिकाणी ग्रीन स्टीकर चिटकविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech