अमरावती : कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी मातेची पालखी दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपूरला जाते. या पालखीला दहा मानाच्या पालखीत स्थान आहे. विदर्भातली ही एकमेव पालखी आहे. ही पालखी पंढरपूर येथून परत आल्यावर मोठा दहीहंडी सोहळा होतो. यंदाचा हा सोहळा ११ जुलैला होणार आहे. त्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी १५९४ पासून संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी सुरू केली. तेव्हापासून अखंडपणे ती सुरू आहे.
यंदा ४३१ वर्ष पूर्ण झाले. यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालखी सोहळ्यासाठी विशेष बैठक घेतली. वारकर्यांसाठी अनेक सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या श्री रुक्मिणी माता पालखी सोहळ्यात डॉक्टर, रुग्णवाहीका, पोलिस सुरक्षा व मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून योग्य नियोजन करून दिले. श्री रुक्मिणी माता पालखी सोहळा प्रमुख व श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूरचे सचिव सदानंद साधू यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वारकर्यांच्या सुविधेबद्दल आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. तसेच ११ जुलै रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे होणार्या भव्य दहीहंडी उत्सवाचे निमंत्रण दिले.