न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

0

छत्रपती संभाजीनगर : न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे, न्यायमूर्ती ए.एस. चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्या. नितीन सामरे, न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी, भारताचे महाअधिवक्ता अनिल सिंग, राज्याचे अभियोक्ता अमरजित सिंग गिरासे, उच्च न्यायालय प्रबंधक एस.एस.अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सह सचिव एस.एस. पल्लोड, विलास गायकवाड, तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख आदी मान्यवर तसेच सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई यांचीही सोहळ्यास उपस्थिती होती.

वकील संघाच्या वतीने न्या. गवई यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी विधिज्ञ साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरणही न्या. गवई यांच्या हस्ते करण्यात आले. न्या. गवई म्हणाले की, वडिलांच्या आग्रहाखातर मी वकील व नंतर न्यायाधीश झालो. लोकांना सामाजिक आर्थिक समता देणारा न्याय देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाच्या सुत्रानुसार न्यायदानाचे काम मी करीत असतो. न्यायदान ही एक नोकरी नसून ती आपल्या हातून होत असलेली देशसेवा आहे, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद खंडपीठात काम करतांना व येथील वास्तव्यातील अनेक आठवणीत न्या. गवई रमले होते. न्यायाधीश म्हणून काम करतांना आपण घेतलेल्या शपथेशी एकरुप होऊन आणि संविधानाची मूल्ये जपून आपण न्यायदानाचे काम करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech