मुंबई : भारतातील प्रीमियर हिंदी चित्रपटांचे चॅनल सोनी मॅक्स आपल्या प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट २९ जून रोजी दुपारी १ वाजता सोनी मॅक्स वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. परदेशात अडकलेल्या एका नागरिकाला सोडवण्याबाबतच्या सत्य कथेवर आधारित या चित्रपटात पाकिस्तानातील भारतीय राजदूत जे. पी. सिंह च्या प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम आहे. उझ्मा अहमदच्या प्रकरणात जे. पी. सिंहची महत्त्वाची भूमिका होती. उझ्मा अहमद एक भारतीय महिला असून आपल्याला बळजबरीने एका विवाहबंधनात अडकवण्यात आल्याचा तिचा दावा होता. ती संरक्षणासाठी भारतीय दूतावासाचा आश्रय घेते.
खैबर पख्तूनख्वाच्या सुंदर परंतु संघर्षाखाली असलेल्या खोऱ्यापासून या चित्रपटाची सुरुवात होते. तेथे आणून ठेवलेल्या असंख्य अपहृत महिलांपैकी एक आहे भारताची उझ्मा. येथे या महिलांचा अनन्वित छळ केला जातो. उझ्माला एका बनावट विवाहात ओढले जाते आणि विवाहानंतर तिला कैद करून तिचा छळ केला जातो. तेथून निसटण्याचा प्रयत्न ती करत राहते. या प्रकरणात सिंह यांनी गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीमधून मार्ग काढून उझ्माला सुरक्षितपणे भारतात कसे पोहोचवले याची कहाणी आहे. तसे करताना त्यांना नैतिक दुविधा आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्यांच्यावर येणाऱ्या संशयाला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे.
सोनी मॅक्सवर या चित्रपटाचा प्रीमियर होण्याअगोदर अभिनेता जॉन अब्राहमने जे. पी. सिंह यांची भूमिका साकारण्याचा आपला अनुभव शेअर करताना म्हटले, “एका राजदूताची भूमिका करण्याचा अनुभव अद्भुत होता. एका राजदूताच्या प्रत्यक्ष जीवनाशी माझा परिचय आधीच झालेला आहे, कारण मी मद्रास कॅफे, बाटला हाऊस आणि परमाणु या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची भूमिका केली आहे. डिप्लोमॅट चित्रपटाची भूमिका मला पुन्हा त्या क्षेत्रात घेऊन गेली. आणि यावेळीही माझा अनुभव खूप आनंददायक होता.” तो पुढे म्हणतो, “राजकीय घडामोडींच्या बाबतीत मी जागरूक आहे. त्यामुळे जगात काय चालले आहे याची मला समज आहे. मला वाटते, ज्या लोकांना राजकीय पातळीवर आणि आपल्या आसपास काय चालले आहे याची जाणीव नाही, त्यांना हा चित्रपट शिक्षित करेल.”
हा चित्रपट बंद दरवाजांच्या मागे काय चालते, जे बातम्यांमध्ये कधीच दिसत नाही, त्यावर प्रकाश टाकते. हे कूटनीतीचे मौन विश्व आहे. या चित्रपटात दाखवले आहे की बऱ्याच वेळा मोठमोठी कूटनीतीची युद्धं शस्त्रास्त्रांनी नाही, तर शब्दांनी, रणनीतीने आणि न बोलता लढावी लागतात. या चित्रपटात जे. पी. सिंह यांना उझ्मा अहमदला भारतात सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी कूटनीतीची आव्हाने, जिओपॉलिटिकल तणाव आणि कायद्याचा लढा कसा द्यावा लागला याचे चित्रण आहे. प्रत्यक्ष तंटा न करता रणनीती आणि माणसाचा दृढनिर्धार कसे काम करून जातात हे यात बघायला मिळते. एका आगळ्यावेगळ्या चित्रपट अनुभवासाठी सज्ज व्हा. एक असा अनुभव ‘जो सबको दीवाना बना दे’. बघा, ‘द डिप्लोमॅट’ संडे मेगा प्रीमियरमध्ये २९ जून रोजी दुपारी १ वाजता फक्त सोनी मॅक्सवर.