कोलकाता विधी महाविद्यालयात झाला अत्याचार
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता पुन्हा एकदा एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार प्रकरणानंतर आता कोलकाता येथील एका विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आलीय. कोलकातातील लॉ कॉलेजच्या आवारात २५ जूनच्या रात्री एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये दोन विद्यार्थी आणि संस्थेच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सदर कर्मचारी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या तो तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याची माहिती पुढे आली आहे. मनोजित मिश्रा (३१), जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखोपाध्याय उर्फ प्रमित मुखर्जी (२०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीची कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज (सीएनएमसी) येथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
संशयित आरोपी मनोजित आणि जैब याला २६ जून रोजीच्या संध्याकाळी तालबागन क्रॉसिंग येथील सिद्धार्थ शंकर शिशू रॉय उद्यानाजवळ अटक केली. दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तिसरा संशयित प्रमितला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचाही फोनही जप्त करण्यात आला. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. दक्षिण चोवीस परगणा येथील अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना या आरोपींना पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना सखोल करण्यास सांगण्यात आले आहे.