ठाणे-कल्याण-भिवंडी भूमिगत मेट्रोसह रस्ता रुंदीकरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

0

ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्गाचा आढावा

मुंबई : भिवंडी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण, वेगवान पायाभूत विकासासाठी भूमिगत मेट्रोसह रस्ता रूंदीकरण तसेच नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषित केला. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर भिवंडी शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रूंदीकरण प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात यावे. भिवंडीवासियांसाठी मेट्रो प्रमाणेच रस्ता रुंदीकरणही महत्वाचे असल्याने दोन्ही प्रकल्पांचे काम सोबतच सुरू कराव्यात. रस्ता रूंदीकरण प्रकल्प राबविल्यामुळे भिवंडी शहरातील उत्तर भागाचा सर्वांगीण विकास होणार असून या भागातील नागरिकांचे दळण वळण गतीमान होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-५ या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्यापुढे अंबरनाथ जवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांना मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

मुंबई महानगर प्रदेशमध्ये भिवंडी हे मालवाहतुकीचे विकासकेंद्र होत आहे. या शहराच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. शहरातील पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी बैठकीत दिली. मेट्रोचे काम करताना ‘डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी. तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता आणि मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

या बैठकीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त अमोल सागर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५ ठळक वैशिष्ट्ये
# लांबी: एकूण ३४. २३ किमी. यात मेट्रो मार्ग -५ टप्पा १ (११.९० किमी), मेट्रो मार्ग -५ टप्पा २ (१०.५ किमी) आणि मेट्रो मार्ग -५अ (११.८३ किमी) यांचा समावेश आहे.
# स्थानके : १९ स्थानके ( १ भूमिगत आणि उर्वरित उन्नत)
# ट्रेनची रचना : सहा डब्यांची ट्रेन.
# प्रस्तावित डेपो : कशेळी येथे (२६.९३ हेक्टर).
# इंटरचेंज स्थानके: कल्याण स्थानक (मेट्रो मार्ग १२ सह) आणि कापूरबावडी (मेट्रो मार्ग ४ ).
# प्रकल्पाची अंदाजित किंमत:
* मेट्रो मार्ग ५ : ८ हजार ४१७ कोटी रुपये आणि मेट्रो मार्ग ५ अ: ४ हजार ६३ कोटी रुपये.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech