“पृथ्वीवर सीमा नाही, आपण सर्व एकच”- शुभांशू शुक्ला

0

अंतराळवीराने मोदींशी साधला १८ मिनीटे संवाद

नवी दिल्ली : अंतराळातून पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत असे प्रतिपादन अंतराळवीर शुभांशू शुक्ला याने केले. ऑक्झियम मिशन-४ वर असलेल्या शुभांशूने आज, शनिवारी पंतप्रधानांशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधताना उपरोक्त विधान केले. तर भारतापासून दूर असलात तरी तुम्ही भारतीयांच्या जवळ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू २६ जून रोजी दुपारी ४.०१ वाजता २८ तासांच्या प्रवासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे इथे येऊन खूप छान वाटत आहे.

पृथ्वीपासून कक्षेपर्यंतचा माझा ४०० किलोमीटरचा प्रवास खूप महत्त्वाचा होता. मी अंतराळात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना आज मला अभिमान वाटतोय. हा प्रवास फक्त माझा नाही तर संपूर्ण देशाचा प्रवास आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आजचा भारत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक संधी देतोय असे शुभांशू शुक्लाने सांगितले. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीय पाहत आहे की तुम्ही किती साधे आहात. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना गाजराचा हलवा दिला का? यावर शुभांशू यांनी हो, मी माझ्या सहकाऱ्यांना गाजराचा हलवा दिल्याचे सांगितले.

त्यानंतर मोदींनी विचारले की, तुम्हाला पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळाली आहे, तुम्ही सध्या कुठे आहात? त्यावर शुभांशू म्हणाले की, आम्ही निश्चित सध्या कुठे आहोत सांगता येणार नाही. आम्ही पृथ्वीला १६ वेळा प्रदक्षिणा घालतो, तसेच १६ सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतो. आम्ही २८ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करतो. हा वेग आपला देश किती वेगाने पुढे जात आहे हे दर्शवत असल्याचे शुभाशू म्हणाले.

पृथ्वीचे पहिले दृष्य पाहिल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला की पृथ्वी एकसारखीच आहे. बाहेरून कोणतीही सीमारेषा किंवा सीमा दिसत नाही. जेव्हा मी भारत पाहिला तेव्हा तो खूप भव्य आणि मोठा दिसत होता. पृथ्वी विविधतेत एकता दर्शवते. पृथ्वी आपले घर आहे आणि आपण सर्व एक आहोत असे शुभांशूने सांगितले. तुमच्याशी बोलताना मी माझे पाय बांधले आहेत कारण येथे गुरुत्वाकर्षण शून्य आहे. जर मी हे केले नाही तर मी तरंगायला सुरुवात करेन. इथे झोपणे हे एक मोठे आव्हान आहे. चालणे, खाणे-पिणे हे देखील आव्हान आहे. कारण आपल्या शरिराला गुरुत्वाकर्षणाची खूप सवय झालेली असते, त्यामुळे इथे ते सर्व खूप कठीण होते असे शुभांशू म्हणाले.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला गती आणि नवीन बळ देईल. भारत आता जगासाठी अवकाशातील नवीन उपक्रमांसाठी दरवाजे उघडणार आहे. आता भारत केवळ उड्डाण करणार नाही, तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ तयार करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech