मुंबई : मराठी विषयावरून वाद निर्माण करत राजकीय पोळी भाजण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो योग्य नाही, अशा परखड शब्दांत भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विरोधी पक्षांना सुनावले आहे. तसेच मराठी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे मराठीच सक्तीची आहे व हिंदी पर्यायी आहे आणि ती का? कशासाठी आहे? त्यात मुलांसाठी, पालकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘कर्तव्यपथ‘ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी म्हटले कि, हिंदी भाषेसंदर्भात माशेलकर समिती नेमली गेली होती. त्या समितीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू भालचंद्र माशेलकर, थोरात यांसह ज्यांना समाजात प्रतिष्ठा, नावलौकिक आहे अशा लोकांचा सहभाग होता. परंतु उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी समितीचा अहवाल स्वीकारला याचा अर्थ माशेलकर समितीच्या अहवालात ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्या मान्य असून त्या आम्ही स्वीकारतो असा स्पष्ट अर्थ होतो. आता संजय राऊत यातून पळवाट काढतांना दिसत असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला. तसेच राज-उद्धव यांनी एकत्र यायचे कि नाही हा सर्वस्वी त्या दोन नेत्यांचा, पक्षांचा विषय आहे. राज्यात अनेकदा मोर्चे झालेत त्यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेत. म्हणजे येणाऱ्या निवडणुकांत युती झालीच असे मानायचे कारण नाही, असेही दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या भविष्यासाठी जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्या अंतर्गत भूमिका मांडलेली आहे. ज्यावेळी देशात स्पर्धेत उतरावे लागेल त्यावेळी या गोष्टींचा फायदा होईल, असे प्रामाणिक मत होते आणि आहे. परंतु हिंदी सक्तीची गोष्टच झाली नाही ती सक्तीची, सक्तीची म्हणत ‘साप सांगून भुई थोपटण्याचा’ प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यातील मुलांची, त्यांच्या भविष्याची चिंता आहे. परंतु हे करत असताना मराठीच सक्तीची आहे हिंदीची कुठेही सक्ती नाही हेही त्यांनी स्पष्ट केल्याचे दरेकर म्हणाले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले कि, अजित पवार यांची भूमिका वेगळी नाही. त्यांनी तिसरी पर्यंत हिंदी सक्तीची केले नाही तरी चालेल असे सांगितले आहे. परंतु सरकार म्हणून मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भूमिका एकच आहे. मराठी सक्तीच्या बाबतीत तिन्ही नेते एकत्र आहेत. हिंदी सक्तीची नाही हे तिघांनीही सांगितल्याचे दरेकर म्हणाले.
जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मनात विरोधकांना स्थान नाही
सोमवार पासून अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर दरेकर म्हणाले कि, विरोधकांच्या आरोपांतच दम नाही. कुठलातरी विषय काढून रडीचा डाव खेळून प्रसिद्धीत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातील प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना आधार देत आपली भूमिका मांडली पाहिजे. परंतु ज्या समस्या नाहीत त्या समस्या बनवायच्या व आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा. कदाचित अशामुळे प्रसार माध्यमांत त्यांचे अस्तित्व राहील परंतु जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मनात अपयशी ठरलेले विरोधकांचे स्थान असेल, अशी टिकाही दरेकरांनी केली.