ठाकरे गट, मनसेकडून हिंदी सक्ती आदेशाची प्रतिकात्मक होळी, ५ जुलैला महा भव्य मोर्चा
मुंबई : आमचा हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. या माध्यमातून आम्ही सरकारवर कसलाही दबाव आणू इच्छित नाही. आम्ही हे स्वीकारतच नाही. त्यामुळे एखादी गोष्ट ते लादत असतील, तर आम्ही हा विषय संपवला आहे. आम्ही या जीआरची होळी केली आहे. त्यामुळे आता तो जीआर आहे, असे मानण्याचे कारण नाही. ५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. यात अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन मराठीची ताकद दाखवून द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्यापासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधक एकजूट असल्याचे तूर्तास यातून दिसून आले.
हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनात खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे नितीन सरदेसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षातील प्रमुख नेते सहभागी झाल्याचे दिसून आले. तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर ठाकरे पत्रकारांसोबत बोलत होते.
तज्ज्ञांच्या समिती स्थापनेसंदर्भातील चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सत्तेत असताना आम्ही एक अभ्यासगट केला होता. मात्र त्याचे पुढे काय झाले? या संदर्भात काहीच कुणी सांगत नाही. त्याची एकही बैठक झाली नाही आणि कुणी अभास न करता हा निर्णय अचानकपणे का लादला गेला? हा कुणी लादला? कुणाचा दुराग्रह आहे? हे सुद्धा अजित पवारांनी जाहीर केलं तर बरं होईल. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात ‘हिंदीसक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया’ असा मजकूर लिहिला आहे.
संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा पहिला टप्पा होता तो शासन निर्णयाची होळी करणे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येत आहे. यात केवळ शिवसैनिक सामील नाही, तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केला आहे. उद्या अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा चर्चा मांडू.
दरम्यान, ५ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचे सत्र सुरु आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची मुंबईतील दादरमधील मनसेच्या राजगड या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार उपस्थित होते. अशा प्रकारे विविध ठिकाणी मनसे आणि ठाकरे गट यांची जोरदार तयारी आणि आंदोलन सुरू असल्याचे दिसून आले.