मुंबई : राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचाराच्या घटना, राज्यातील जनतेची व शेतकऱ्यांची सरकारकडून होत असलेली फसवणूक यावर ताशेरे ओढले.
या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशीकांत शिंदे उपस्थित होते. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे लोकं वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत. पोलिसांचे त्यांना संरक्षण आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देत आहेत. नेमके भाजप आणि गद्दार यांनी आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला जायचं म्हणजे पापच ! भ्रष्टाचाराचे डाग घेऊन जे लोक चहापान कार्यक्रमाला जातील, त्याच लोकांकडे बघून मुख्यमंत्री म्हणतील, याच लोकांवर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना त्यांच्याच विधानावरून टीका केली. ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचे नाव दिलं गेले; त्यावरच खड्डे पडले आहेत. नदी वाहत आहे, हे नेमकं काय चालले ? असा प्रश्न समृद्धी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
भ्रष्टाचारात अखंड बुडालेले हे सरकार आहे. कामे पैसे दिल्याशिवाय होत नाही. निधी हवा, तरी टक्केवारी मोजावी लागते, असा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. कांदा, कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव नाही. कापसाला कीड लागलेली नसताना साहाय दिले जात नाही. सरकारने सत्तेवर आल्यावर जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
महायुती सरकार राजकीयदृष्ट्या उध्वस्त झालं आहे. या सरकारचा चालू असलेला राजकिय जुगार हा केविलवाणा आणि किळसवाणा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहे, त्याला राजकीय रंग का दिला जातोय? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून आवश्यकता नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग रहित करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.