वॉशिंग्टन डीसी : एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर उघडपणे टीका केली आहे. त्यांनी ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेले नवीन कर आणि खर्च विधेयक अमेरिकेसाठी विनाशकारी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या मसुद्यामुळे अमेरिकेचे गंभीर नुकसान होईल आणि लाखो नोकऱ्या जातील. एकेकाळी ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेले मस्क आता उघडपणे ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना दिसत आहेत. एलोन मस्क यांच्या मते हे विधेयक अमेरिकेच्या भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योगांसाठी घातक ठरू शकते. त्यांनी सांगितले की, हे विधेयक जुन्या उद्योगांना सवलती देते तर भविष्यातील उद्योगांना हानी पोहोचवते. या विधानाद्वारे त्यांनी सूचित केले की, हे विधेयक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या वेगाने उदयोन्मुख उद्योगांच्या विकासात अडथळा ठरू शकते.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या या विधेयकात अशा अनेक तरतुदी आहेत. ज्यांचा अमेरिकेच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. मेडिकेड आणि फूड स्टॅम्प सारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च कपात. संरक्षण आणि सुरक्षा बजेटमध्ये मोठी वाढ जसे की, अमेरिका-मेक्सिको सीमेवरील भिंतीच्या विस्तारासाठी ४६ अब्ज डॉलर, १ लाख स्थलांतरित बंदी खाटांसाठी ४५ अब्ज डॉलर, १०,००० नवीन आयसीईअधिकाऱ्यांची भरती ज्यांच्यासाठी १०,००० डॉलरचा स्वाक्षरी बोनस आहे. ३५० अब्ज डॉलर सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षा योजनेचा भाग इत्यादींचा समावेश आहे.