श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेसकोड जाहीर

0

कार्ला : कार्ला (ता. मावळ) येथील आई एकविरा देवी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि आगरी, कोळी समाजाचे कुलदैवत आहे. आता याच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी येत्या ७ जुलैपासून पोषाखाबाबत नवीन नियमावली लागू केली जाणार आहे. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थान ट्रस्टची नुकतीच याबाबत बैठक संपन्न झाली. त्यात सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मंदिरातील धार्मिक वातावरणाची पवित्रता टिकवण्यासाठी आणि पारंपरिक मूल्यांना सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या निर्णयानुसार, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टच्या निर्णयानुसार हा ड्रेस कोड ७ जुलैपासून प्रत्यक्षात येणार आहे. ड्रेस कोड नियमांमध्ये महिलांसाठी साडी, सलवार-कुर्ता किंवा अन्य भारतीय पारंपरिक पोशाख, तसेच पुरुषांसाठी धोतर-कुर्ता पायजमा कुर्ता, पँट-शर्ट किंवा पारंपरिक वेशभूषा असणार आहे. दरम्यान मंदिरात येताना वेस्टर्न ड्रेस, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स, हाफ पँट्स, फाटलेली जीन्स यांसारखे पोशाख घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्रेस कोडबाबत घेण्यात आलेल्या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, सह खजिनदार विकास पडवळ तसेच विश्वस्त पूजा अशोक पडवळ आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech