हिंदी सक्ती : मनसेकडून फडणवीसांना ‘हिंदीहृदयसम्राटा’ची उपमा

0

अमेय खोपकरांकडून मराठी कलाकारांना आवाहन

मुंबई : राज्यात एकीकडे हिंदी सक्ती विरोधात मनसे, ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. दरम्यान मनसेकडून ट्विटर पोस्टच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘हिंदीहृदयसम्राट’ असा कुत्सित उल्लेख केला आहे. तसेच त्यामध्ये त्यांना मराठीचे मारेकरी हिंदीची सेवेकरी असे म्हणत डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यात सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांनी एकत्र येत ५ जुलै रोजी विराट मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाची तयारी जोरदार सुरू आहे.

राज्यभरात पहिलीपासून हिंदी सक्तीकरणाविरोधात प्रचंड रोष असल्याचे गेल्या काही दिवसांत समोर येत आहे. त्यामुळे हिंदी सक्ती मागे घ्यावी अशी मागणी एकमुखाने होत आहे. यावर सरकारकडूनही हिंदी सक्ती नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटांमध्ये मात्र याबाबत संमिश्र भावना आहे. त्यामुळे हिंदीवरून महायुतीमध्येच दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे ५ जुलैच्या मोर्चाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सुद्धा मराठी कलाकारांना इशारा देत कृतज्ञतेची भावना ठेवत ५ जुलै रोजी मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं आहे. खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या मराठी भाषेमुळे प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण कृतज्ञता म्हणून सर्वांनी पाच जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया पाच जुलैला मराठी मालिका चित्रपट यांच्या शूटिंग बंद ठेवावे अशी विनंती असल्याचे पोस्टमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर यांना मोर्चाच्या आयोजनासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून अनिल परब सक्रिय आहेत. वरूण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीगाठी होत आहेत. संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांचीही भेट झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech