यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री व या उत्सवाचे आधारवड एकनाथ शिंदे यांना केले असून लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की, गोविंद (दहीहंडी) उत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्वाचा सण असून त्यात हजारो युवक सहभागी होतात. गोविंदा खेळताना होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती होतात. या पार्श्वभूमीवर, गोविंदा पथकांतील खेळाडूंना औषधोपचार व विमा संरक्षण मिळावे यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्य शासनाने विमा संरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या पक्षाचे नेते श्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या संदर्भात लेखी निवेदन सादर केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक दाखवली असून लवकरच राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत शासनाकडून निर्णय होईल अशी ग्वाही दिली आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येक वर्षी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हजारो गोविंद पथक रस्त्यांवर उतरतात. यावेळी होणाऱ्या संभाव्य अपघातांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. मागील वर्षीही याच स्वरूपाचा निधी गोविंदा सणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला होता. हा निर्णय गोविंद उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल असून, यामुळे उत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech