दत्तात्रेय गाडेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

0

पुणे : स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. गाडे याच्या जामीन अर्जावर आरोपी पक्षासह बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर, यांच्या सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.न्यायालयीन कोठडी सुनावल्याने येरवडा कारागृहात असलेल्या गाडे याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसार व तरुणीच्या वकील श्रीया आवले यांनी विरोध केला होता. लैंगिक अत्याचार तरुणीच्या इच्छेविरुद्ध व तिच्या संमतीशिवाय केला गेलेला आहे. तपास यंत्रणेचे म्हणणे व आरोपपत्रातील तपशील यांचा संदर्भ देत विशेष सरकारी वकिलांनी असे निर्देशित केले की, काही अत्यंत महत्त्वाचे व निर्णायक पुरावे तपासात आले आहेत.

तरुणीच्यावतीने अ‍ॅड. श्रीया आवले यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीने यापूर्वी तरुणीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला असून तो पुन्हा तसे करू शकतो. तर, आरोपी व तरुणी यांच्यातील संबंध परस्पर संमतीने झालेले आहेत. असे कोणतेही कृत्य घडलेच नाही. आरोपीचे पूर्वीचे गुन्हे हे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचे नसून, चोरी व दरोड्याचे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारीला पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून तरुणीवर बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech