नवी दिल्ली : दक्षिण युरोप आणि ब्रिटन सध्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. सोमवारी स्पेन आणि पोर्तुगालमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी इटली आणि फ्रान्समध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील देशांमध्ये या हंगामातील पहिली तीव्र उष्णतेची लाट आली आहे. सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आणि मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. फ्रान्सच्या पर्यावरण मंत्री एग्नेस पानय-रॅनाशे म्हणाल्या की, असे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते. फ्रान्सच्या १६ प्रदेशांना रेड अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पर्यटन स्थळांवर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
फ्रान्स, तुर्की आणि इटलीमध्ये जंगलातील आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या सोसाट्याचा वारा आणि उच्च तापमानामुळे अधिक धोकादायक बनल्या आहेत.इटलीमध्ये, रोम, मिलान आणि फ्लोरेन्स सारख्या प्रमुख शहरांसह पुढील काही दिवस १८ शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये या आठवड्यात शालेय वर्ष संपत आहे, तर स्पेन, पोर्तुगाल आणि इटलीमध्ये सुट्ट्या आधीच सुरू झाल्या आहेत.मुलांसाठी या देशांमध्ये उन्हाळी शिबिरे देखील चालवली जात आहेत.