गोंदण कलेचा समावेश कला अभ्यासक्रमात करण्याकरिता पावले उचलावीत – शेलार

0

मुंबई : पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री.एँड आशिष शेलार यांनी आज येथे दिले. आज मंत्रालयात महाराष्ट्रतील पारंपारिक गोंदणकलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी हे निर्देश दिले. यावेळी सांस्कृतिक कार्य उप सचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, सह संचालक श्रीराम पांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह सचिव संतोष खारेगडे, कला संचालक किशोर इंगळे, यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र गोंदणकला संस्कृती महामंडळाचे मच्छिंद्रजी भोसले, विश्वास दोर्वेकर आदींसह गोंदणकलाकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. राज्याच्या सर्व भागात समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपारिक गोंदणकलेसंदर्भात सर्वंकष संशोधन होणे आवश्यक आहे, अशी भावना मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. नवयुवकांमधे टाटू आर्टच्या माध्यमातून गोंदणकला लोकप्रिय असून गोंदणकलेमुळे हजारो नवयुवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे या कलेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या कलेविषयी संशोधन करून उच्च शिक्षण अभ्यासक्रमात गोंदणकलेचा समावेश केल्यास हजारो नवयुवकांना एक पारंपारिक कला आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून उपजीवीकेसाठी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech