सोलापूर : यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर उल्हसित झालेल्या आणि सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुर झालेल्या वैष्णवजनांच्या गर्दीने आणि ते करत असलेल्या हरिनामाच्या गजराने सध्या पंढरीला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर भक्तीचा महापूर आल्याचे चित्र आहे. यावर्षी राज्यभरातील पालखी सोहळ्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर अपवाद वगळता आल्हाददायक वातावरण राहिले आहे. गतवर्षी भाविकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र उन्हाऐवजी ढगाळ वातावरण, हलकासा वारा आणि अधून-मधून क्वचित येणारी पावसाची सर अशा उल्हास भरल्या वातावरणात पंढरीकडे मार्गक्रमण चालू आहे.
सध्या बहुतांश सर्वच पालखी सोहळ्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला असून एक-दोन दिवसात लाडक्या विठुरायाच्या पंढरपूर तालुक्यात दाखल होत आहेत.त्यामुळे चरणस्पर्श दर्शनाची आस लागून राहिलेले हजारो भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या दिंड्या-पालख्यांनी आणि त्यासोबत असणारे भगव्या पताकाधारी भाविक व डोईवर तुळस घेतलेल्या महिला भाविकांनी पंढरीचे मार्ग फुलून गेले आहेत. मुखी हरिनामाचा गजर आणि जोडीला टाळ-मृदंगाचा निनाद यामुळे अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. मुक्कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या कीर्तन, भजन, प्रवचन, भारुड, आदी आध्यात्मिक कार्यक्रमांनी अवघे गाव विठ्ठलमय होऊन जात आहे.