बीड कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी एसआयटी स्थापन करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई : बीड जिल्ह्यात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी(दि.१) विधानसभेत केली.तसेच या प्रकरणातील आरोपींना आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. विधानसभेत मंगळवारी(दि.१) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी बीड येथील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बीडमध्ये घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. कोचिंग क्लासच्या माध्यमातून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली असून त्यातील एका मुलीने आणि तिच्या आईने गुन्हा नोंदवल्याने याबद्दलची वस्तूस्थिती बाहेर आली.

या घटनेचा पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपींना दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली, यासंदर्भात चौकशी केली जाईल. या प्रकरणात राज्यात मोठ्या प्रमाणात रोष असून याची व्याप्ती अधिक असू शकते अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. एक मुलगी हिंमतीने समोर आली. पण आणखी अशा किती मुलींसोबत असा व्यवहार झाला, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि यातील संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तयार करण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी केली.

“एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? यामागे कुणाचा वरदहस्त आहे का? कुणी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे वळण देत आहे का? या सगळ्याची चौकशी करण्यात येईल. तसेच या माध्यमातून आमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू. टाईम बाऊंड पद्धतीने एसआयटी याची चौकशी करेल. याप्रकरणाचा पूर्ण छडा लावून अशा नराधमांना आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech