वॉशिंगटन : भारत आणि अमेरिका व्यापार करार करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू होती. आता स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (दि. १) याची पुष्टी केली. ट्रम्प यांनी संकेत दिले की, भारत अमेरिकन कंपन्यांवरील कर कमी करण्यास तयार आहे, ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्याची संधी मिळेल. माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘मला वाटते की, आमचा भारतासोबत वेगळ्या प्रकारचा व्यापार करार होईल. असा करार ज्यामध्ये आम्ही भारतात जाऊन खुलेपणाने स्पर्धा करू शकू. भारताने आतापर्यंत परदेशी कंपन्यांसाठी बाजारपेठ उघडली नव्हती, परंतु आता त्यात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर भारताने असे केले, तर अमेरिका कमी करासह एक मजबूत व्यापार करार करेल.’
भारताने अमेरिकन उत्पादनांसाठी आपला दुग्ध बाजार खुला करावा असे अमेरिकेला वाटते, परंतु भारताने स्पष्ट केले आहे की, ते या मागणीवर तडजोड करणार नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुग्धव्यवसायावर सवलतीचा प्रश्नच उद्भवत नाही. ही आमच्यासाठी लाल रेषा आहे. भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्रात सुमारे ८ कोटी लोक रोजगार करतात, ज्यापैकी बहुतेक लहान शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत, सरकारला या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सवलत देणे शक्य नाही. वृत्तानुसार, भारतीय अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गेल्या आठवड्यापासून सोमवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करत होते. विशेष सचिव राजेश अग्रवाल हे भारतातील या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून, त्यांनी गतिरोध दूर करण्यासाठी त्यांचा दौरा आणखी एक दिवस वाढवला आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी भारतावर २६ टक्के कर (आयात शुल्क) लादण्याची घोषणा केली होती, जी ९० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तथापि, किमान १० टक्के कर अजूनही लागू आहे. जर दोन्ही देशांदरम्यान हा करार झाला, तर व्यापार संबंधांमध्ये हा एक मोठे वळण ठरू शकते.