बंगळूरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात राजकीय गदारोळ पाहायला मिळत आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, तेच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः सत्ताधारी काँग्रेसमध्ये, सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील सत्ता वाटप कराराचा हवाला देत या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री बदलाची अटकळ बांधली जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, मीच पाच वर्षे मुख्यमंत्री असेल. तुम्हाला शंका का आहे? सिद्धरामय्या यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसने काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा दावा केला होता.
तर यावर डीके शिवकुमार यांनी देखील राज्यात नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये कोणताही असंतोष नाही. सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे नेतृत्वाच्या मुद्द्यावर कोणत्याही वादाची गरज नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, मे २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात जोरदार स्पर्धा झाली होती. डीके शिवकुमार यांच्या मागे मोठा जनाधार होता, मात्र काँग्रेसने त्यांच्याऐवजी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवले. त्यावेळी अशी चर्चा होती की, दोघांमध्ये अडीच-अडीच वर्षांचा करार झाला आहे. मात्र, पक्षाने कधीच त्याची अधिकृतपणे पुष्टी केली नाही.