लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या अंडर-१९ संघात तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी केली. वैभवने वेगाने फंलदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ८६ धावांच्या स्फोटक खेळीमुळेच भारताने हा सामना ४ विकेट्सने जिंकला आणि ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व अभिज्ञान कुंडूने केले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने प्रथम फलंदाजी करत ४० षटकांत २६८ धावा केल्या.
इंग्लंडकडून कर्णधार थॉमस रेव्हने सर्वाधिक ७६ धावा केल्या. भारताला विजयासाठी ४० षटकांत २६९ धावांची आवश्यकता होती. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अभिज्ञान कुंडू १२ धावा करून बाद झाला. पण यानंतर वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद फलंदाजी करत पहिल्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वैभवने ३१ चेंडूत ९ षटकार आणि ६ चौकारांसह ८६ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विहान मल्होत्रानेही ३४ चेंडूत ४६ धावांची महत्त्वाची खेळी केली. भारतीय संघाला या मालिकेतील दुसरा विजय मिळवून दिला.