लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने भारतीय संघ या सामन्यात उतरला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे आणि भारताने पाच विकेट गमावल्यानंतर ३१० धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसअखेर शुभमन गिल ११४ धावांसह आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर खेळत आहेत. या दोघांमध्ये ९९ धावांची भागीदारी झाली आहे.
लीड्सनंतर गिलने एजबॅस्टन कसोटीतही शतक झळकावले आहे. इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय ठरला. त्याने मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांची बरोबरी केली. भारतीय कर्णधाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक १९९ चेंडूत पूर्ण केले. गिलने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही शतक झळकावले होते. त्याआधी २०२४ मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला होता. तेव्हा गिलने धर्मशाळेत खेळलेल्या सामन्यात ११० धावांची खेळी केली होती. इंग्लंडविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला.