फडणवीस, शिंदे, नितेश राणेंनी माफी मागावी – संजय राऊत
मुंबई : शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाची हत्या किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.याच मुद्यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांनी आदित्य ठाकरेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीनचीट मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ‘दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा क्लिन चिट रिपोर्ट आला आहे. हे पोलिस आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही ती तुम्हीच स्थापन केली होती. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगले काम केले. त्यांचे नेतृत्व खच्ची करण्याचे काम केले. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे, इतर भाजप नेते, एकनाथ शिंदे, या सर्वांनी उबाठा गट आणि आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करुन, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र दिशाच्या मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही. दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती. शिवाय वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. कुटुंबाशी झालेल्या वादामुळे आणि तिचे व्यवसायिक व्यवहार व्यवस्थित होत नसल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
याप्रकरणी तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण झालेली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असून, त्यात कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न झाल्याचं आढळून आले नाही. म्हणून दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगत मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टाकडे केली होती. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.