मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला ‘सितारे जमीन पर’

0

मुंबई : अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ सिनेमा सध्या खूप गाजत आहे. विशेष मुलांवर आधारित हा सिनेमा आहे. यानिमित्त अमृता फडणवीस यांनी बुधवारी (दि.२) मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये विशेष मुलांसाठी ‘सितारे जमीन पर’ सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवलं होत.या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. तसंच अभिनेता आमिर खाननेही हजेरी लावली.

दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सितारे जमीन पर’ च्या स्क्रीनिंगला मुंबईतील १५ शाळांमधील विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना बोलवण्यात आलं होतं. या सर्व मुलांनी पालकांसोबत सिनेमाचा आनंद लुटला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी बसले होते. सोबत अमृता फडणवीस आणि आमिर खानही होते. त्यामुळे या मुलांचा आनंद द्विगुणीत झाला. जवळपास ३०० मुलांनी सिनेमा पाहिला.चित्रपटाची स्क्रीनिंग झाल्यानंतर आमिर खान आणि अमृता फडणवीस यांनी मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी मुलांचे विचार ऐकले आणि त्यांना प्रेरितही केले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा होता.

सिनेमा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले, ” आमिर खान यांनी अतिशय चांगला सिनेमा तयार केला आहे. विशेषत: स्पेशली एबल्ड मुलांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या मुलांमधील विशेष क्षमता समाजासमोर आणणारा हां सिनेमा आहे. या मुलांचे कुटुंब, शिक्षक त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांना समाजात उभं करण्याचा प्रयत्न करतात. समाजानेही त्यांच्याप्रती संवेदनशील असलं पाहिजे हे या सिनेमातून आपल्याला समजतं. म्हणून मी आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे.”

‘”आज या स्क्रीनिंगला जमनाबाई नरसी स्कुल आणि इतर शाळांमधील ३०० मुलं आली होती. सर्वांनी ‘सितारे जमीन पर’ चा आनंद घेतला. समाजाने या मुलांना आदर द्यावा ही शिकवण हा सिनेमा देतो. त्यासाठी आमिर खानचे आभार”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून रोजी प्रदर्शित झाला आहे. आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा व्यतिरिक्त, या चित्रपटात डाउन सिंड्रोमने ग्रस्त मुले देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट एका बास्केटबॉल प्रशिक्षकावर आधारित आहे, जो या मुलांचा प्रशिक्षक बनतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech