मुंबई : मराठीला प्राधान्य असायला हवे, पण त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करत असताना नेते, तज्ज्ञ आणि पालकांचे मत विचारात घेतलं जाईल. अजून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही. सध्या माशेलकर समितीचा अभ्यास करणार आहोत. विरोध करणाऱ्या नेत्यांची बाजू समजून घेऊन अहवाल तयार केला जाईल, तसेच आम्ही वेळेत अहवाल सादर करू, असा विश्वास त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष तथा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला. मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही, असे म्हणणे हे संपूर्णपणे अज्ञानमूलक असल्याचेही डाॅ. जाधव म्हणाले.
अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. राष्ट्रपती सदस्य म्हणून माझी निवड करण्यात आली. राजकीय अनुभव नसलेल्या १२ व्यक्तींची निवड केली जाते. निवड करताना तुम्ही सत्ताधारी गटाच्या बाजूने बसणार की, स्वतंत्र बसणार असा पर्याय दिला जातो. माझी निवड झाली, तेव्हा मी भाजपासोबत बसलो नव्हतो. मी स्वतंत्र बाणा ठेवला होता. दरम्यान राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, मी राज ठाकरे यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे.
भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझ्याकडे शिक्षण, कामगार, रोजगार, कौशल्य, सामाजिक न्याय अशा अनेक विभागांवर मी काम केले आहे. संपूर्ण देशातील शिक्षणाचे काम पाहत होतो. नवीन शैक्षणिक धोरणावरही मी काम केलेले आहे. त्यावर आलेला पहिला ग्रंथ माझाच आहे. त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही, असे म्हणणे, हे संपूर्णपणे अज्ञानमूलक आहे, असे डॉ. नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि माझी भेट झालेली नाही. आमचा केवळ फोनवरून संवाद झाला. माझी संमती सांगितल्यानंतरच अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात आली. समितीत अनेक लोक असणार आहेत. तीन महिने हातात आहेत. मराठीतील मी एक मोठा लेखक आहे. मराठीचा मी अभिमानी आहे. मराठीला प्राधान्य असेलच पाहिजे, अशी माझी भूमिका आणि भावना पहिल्यापासूनच आहे, असेही जाधव म्हणाले.