सोलापूर : भूवैकुंठ पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण झाले आहे. संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यामुळे सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून, लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले आहे. आषाढी यात्रेकरिता आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर, दर्शन रांग व उपनगरीय भाग गजबजला आहे. दर्शनरांगेत तीन लाखांहून अधिक भाविक आहेत. एका मिनिटात जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळत आहे. दर्शनासाठी जवळपास आठ ते दहा तासांचा अवधी लागत आहे.
चंद्रभागा नदीत मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण पंढरपूर शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्यावतीने वारीत येणाऱ्या लाखो भाविकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.