जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये २०२५ ची अमरनाथ यात्रा सुरु आहे. सोमवार ७ जुलै हा यात्रेतील सर्वात गर्दीचा दिवस ठरला आहे. २३,८५७ भाविकांनी पवित्र गुहेत प्रार्थना करत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. एकाच दिवसातील या विक्रमी संख्येसहयात्रा सुरू झाल्यापासून एकूण यात्रेकरूंची संख्या ९३,३३६ वर पोहोचली आहे. भेट दिलेल्या यात्रेकरूंमध्ये १७,२५७ पुरुष, ५,२९७ महिला, ३४१ मुले, २९६ साधू, ९ ट्रान्सजेंडर भक्त आणि ६२५ सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे.
अनुकूल हवामान, कार्यक्षम व्यवस्था आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या चांगल्या सहाय्यामुळे संख्येत वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १२,३४८ यात्रेकरूंनी यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर शुक्रवारी १४,५१५, शनिवारी २१,१०९, रविवारी २१,५१२ आणि सोमवारी २३,८५७ यात्रेकरू सहभागी झाले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी जम्मू विभागात वार्षिक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्याएकूण १८० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे ३ जुलैपासून सुरू झालेली ३८ दिवसांची ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे.