मुंबई : आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करता येऊ शकते. भाजीपाला, पदार्थ खराब असणे, दुर्गंधी येणे, या गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत. तथापि, तेथील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा मार्ग योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. एका आमदारांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषणावह नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलीन होते. या संदर्भात अध्यक्षांनी या घटनेची दखल घ्यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.