पाटणा : “बिहारमध्ये मतांची चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी बिहारच्या जनतेला सांगतो की, महाराष्ट्रचे निवडणूक चोरल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे बिहारची निवडणूकही चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे गरीबांचे मत हिसकावून घेण्याचं एक साधन आहे”, असे राहुल गांधी म्हणाले, ते बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर बोलत केले. यावेळी त्यांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत होती. बिहारमध्ये मतदार पुनर्रीक्षण प्रक्रियेवरून आणि ट्रेड युनियनच्या संपाला पाठिंबा देत इंडी आघाडीने आज पुकारलेल्या बिहार बंदचा प्रभाव रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर स्पष्टपणे दिसून आला. राजधानी पाटणा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव एकत्र रस्त्यावर उतरून विरोधी मोर्चात सहभागी झाले होते.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना म्हणाले, “तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण लक्षात ठेवा की पुढे कायदा तुमच्यावरही लागू होईल. तुम्ही कितीही मोठे असाल, कुठेही बसलेले असाल, कायदा तुम्हाला सोडणार नाही. तुमचं काम भारताच्या संविधानाची रक्षा करणं आहे. बिहारच्या जनतेच्या मनात जे आहे, ते पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे.”
राहुल गांधींनी असंही म्हटलं की, “महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतांची चोरी झाली आहे. आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलो होतो. मी त्यांना विचारलं की, तुम्हाला काय वाटतं? सर्वांनी सांगितलं की निवडणूक आयुक्त भाजपसारखं बोलत होते. ते हे विसरत आहेत की ते कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाहीत, ते भारताचे निवडणूक आयुक्त आहेत आणि त्यांचं काम संविधानाची रक्षण करणं आहे.”
याआधी राहुल गांधी पाटण्यामधील आयकर गोलंबर येथे पोहोचले, जिथे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आधीच उपस्थित होते. येथे महागठबंधनच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर तेजस्वी यादव, राहुल गांधी, दीपांकर भट्टाचार्य आणि मुकेश सहनी यांसारखे महागठबंधनचे नेते वाहनावरून मोर्चासाठी रवाना झाले.