मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे

0

मुंबई : राज आणि मी दोन्ही भाऊ आलो ना एकत्र. कशासाठी आलो. आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही. प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू. माझे आजोबा आणि बाळासाहेब तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. आमच्या डोळ्यादेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं. एकूणच मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईसह महाराष्ट्रातील १४ कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आज आझाद‌ मैदानात आंदोलन करण्यात आले. याला शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सहभागी झाले. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं तर राज्यकर्त्यांना सांगतो तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसली नसती, अशा शब्दात घणाघात केला.

आता उभे राहिलो. जो जो मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यामुळे धीर सोडू नका. हिंमत हरू नका. शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं आणि धारावीत आपला गिरणी कामगार आलाच पाहिजे, ही मागणी घेऊन यायचं. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. एकजुटीची वज्रमूठ अशीच ठेवा. तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ, असे वचनही ठाकरेंनी या निमित्ताने दिले.

गिरणी कामगार, पोलीस आणि सफाई कामगारांना हक्काची जागा द्या. ज्यांच्यावर मुंबई आहे त्यांना हक्काची जागा द्या. आपलं सरकार आलं नाही. नाही तर तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज पडली नसती. काही वेळेला डोळ्यावर पट्टी बांधली जाते. विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र करून बाहेर काढत आहेत. तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कुणाचं लक्ष नव्हतं. तुम्ही अडगळीत पडला, तसे धारावीकर होते. आता धारावी अदानीच्या घशात घातली. 1600 एकर मुंबईची जागा अदानीच्या घशात टाकली. मिठागरं, देवनार डंपिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घातलं. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे बोलत होते.

“आज गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. पूर्वीच्या काळात संप झाला. जे काही ठरलं होतं. ते गिरणी कामगारांना दिलं नाही. कामगारांच्या उरावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. ज्यांनी मुंबई मिळवून दिली. त्यांना शेलू आणि वांगणीला पाठवलं. आमची ठाम मागणी आहे. गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागी जागा द्या आणि अदानीचे टॉवर शेलू आणि वांगणीला बांधू द्या. देवनार डंपिंगवर अदानीला टॉवर बांधू द्या, असेही ठाकरे म्हणाले.

चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं शिष्टमंडळ आलं होतं. म्हणाले की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानात येतोय. शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे. म्हटलं शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरज नाही. शिवसेना तुमचीच आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे आणि सोबतच राहणार आहे. गिरणी कामगार त्यांचा इतिहास, गिरण्यांचा इतिहास हे उरावर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना माहीत नाही. त्यांना मुंबई लुटायची माहीत आहे.

मुंबईसाठी रक्त सांडण्याचं माहीत नाही. गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं तर राज्यकर्त्यांना सांगतो तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसली नसती. त्यावेळीही मुंबईवर अधिकार सांगितला जात होता. पण मराठी माणूस, गिरणी कामगार तर आघाडीवर होता. सर्व रस्त्यावर उतरले. तेव्हाच्या केंद्र सरकारला गुडघ्यावर आणलं आणि आपली मुंबई आपण राखली. त्याच मुंबईत दिल्लीतील मालकाचे नोकर मुंबईकरांना बाहेर काढायला असूसलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech