ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : दिडशे वर्षांपासून या पुलाची कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष अड. राहुल नार्वेकर, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार ऍड मनीषा कायंदे, माजी आमदार राज पुरोहित, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळे प्रकरण संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत, असे सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात जाऊन दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून उद्धवस्त करू शकतो, हे दाखवून दिले. या सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते मनपाने पुलाला सिंदूर नाव दिले, ही आनंदाची गोष्ट आहे. या पुलाची एकूण लांबी ३४२ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी असल्याने निश्चितच मुंबईतल्या वाहतुकीसाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या अडचणीवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. शिवाय सिंदूर पूल मुंबईकरांना समर्पित करीत दुपारी ३:०० वाजेपासून वाहतुकीला खुला होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घोषित केले. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदेमुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डी’ मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे १० वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार.पूल कार्यान्वित झाल्यावर पी डी’ मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक होणार सुलभ होणार आहे.