बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अनेक तेलुगु कलाकारांवर ईडीची कारवाई

0

हैद्राबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील २९ सेलिब्रिटी, युट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरवर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केला आहे.या यादीत अभिनेता विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबाती, मंचू लक्ष्मी, प्रकाश राज, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणिता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, युट्यूबर हर्षा साई, बया सनी यादव यांचा समावेश आहे. सायबराबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

मियापूर येथील ३२ वर्षीय व्यापारी फणींद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली, तेव्हा हा खटला सुरू झाला. सायबराबाद पोलिसांनी २५ सेलिब्रिटींविरुद्ध १९ मार्च २०२५ रोजी एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये आयपीसी, तेलंगणा गेमिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक तरुण आणि सामान्य लोकांनी प्रसिद्ध चित्रपट कलाकारांकडून प्रमोट केल्या जाणाऱ्या या बेटिंग ॲप्समध्ये पैसे गुंतवत असल्याची माहिती समोर आली. तक्रारीनुसार, हे ॲप्स मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात टाकत आहेत.

ईडीने आता हे प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) पुढे नेले असून, या सेलिब्रिटींकडून प्रमोशन, आर्थिक व्यवहार आणि कर नोंदींसाठी मिळालेल्या पेमेंटची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या अ‍ॅप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार आहेत, जे तरुणांना सहज कमाईचे आमिष दाखवून त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करत आहेत. विजय देवेराकोंडाच्या टीमने स्पष्ट केले की, त्याने फक्त स्कील आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म ए२३ चे प्रमोशन केले होते. प्रकाश राज म्हणाले की, त्यांनी २०१६ मध्ये एका अ‍ॅपचे प्रमोशन केले होते, परंतु त्यापुढे कधीही अशाप्रकारचे प्रमोशन केले नाही. दरम्यान, ईडीच्या चौकशीमुळे या सेलिब्रिटींवर दंड आणि कायदेशीर कारवाईचा धोका आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech