सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा
मुंबई : शेकडो वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज (दि.१०) घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच आज चालू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव आहे.
देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सव बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला. पण मला या ठिकाणी मुद्दामहुन उल्लेख करायचाय हे महायुतीचं सरकार मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना, आलेल्या स्पिड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम अतिशय शीघ्रतेने केले. पीओपीच्या परंपरागत मुर्त्यांवर बंदी आणताना सीपीसीबीच्या गाईडलाईन्सचा तत्कालीन सरकारच्या काळातल्या सरकारने बाऊ केला गेला. त्यानंतर पीओपी मुर्त्यांच्या बाबतीमध्ये पर्यावरण पूरक अन्य पर्यायांना समोर ठेवून पीओपी पर्यावरणाला घातक आहे की नाही, या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका आमच्या विभागाने घेतली.
राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत काकोडकर समितीचा अहवाल घेतला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी मुर्त्या बनवणे, डिस्प्ले करणे आणि विकणे यालाही परवानगी मिळाली. आपल्या गणेशोत्सवाच्या बाबतीत महायूती सरकारने भूमिका घेतली असून पोलीस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषता पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागतील तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल. कारण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या शासनाची भूमिका आहे.
सर्व गणेशोत्सव मंडळांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की आपण जे वेगवेगळे देखावे करतात त्यामध्ये आपले सैन्य,सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होतो आहे, असे निवेदन त्यांनी केले.