नवी दिल्ली : राष्ट्रनिर्माण हे कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून युवांनी स्वीकारावे. तसेच प्रत्येक कार्य प्रतिबद्धता आणि समर्पित वृत्तीने करावे. युवकांनी इतरांप्रती संवेदनशील राहावे आणि हाती घेतलेले काम सर्वोत्तम पद्धतीने करावे, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी विद्यार्थी आणि युवा नेत्यांना केले. नोएडा येथे ‘इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) २०२५’ या परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळासाठी संकल्पित केलेल्या ‘पंच प्रतिज्ञांतर्गत’ विकसित भारत २०४७ च्या उभारणीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
युवांनी भविष्यातील भारताचे परिवर्तक आणि क्रियाशील मतप्रवर्तक व्हावे. सामूहिक दृढनिश्चयाने आपण प्रत्येक आव्हानावर मात करू शकतो आणि आपल्या देशाला अधिक उंचीवर नेऊ शकतो, असेही ते म्हणाले. गोयल यांनी भारत एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे याकडे लक्ष वेधले. पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी केलेल्या भाषणाची आठवण करून देत ते म्हणाले की, २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत अमृत काळाचा २५ वर्षांचा काळ हा देशासाठी एक निर्णायक क्षण आहे. २०४७ पर्यंत भारत विकसित देश व्हावा, यासाठी वचनबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी युवांना केले.
गोयल यांनी पंच प्रतिज्ञांविषयी विस्ताराने सांगितले. पाच प्रतिज्ञांपैकी पहिली प्रतिज्ञा म्हणजे भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प. पुढील काही दशकांमध्ये युवा येणाऱ्या काळातील परिवर्तनाचे प्रमुख चालक असतील. पहिली प्रतिज्ञा तेव्हाच प्रत्यक्षात आणता येऊ शकेल, जेव्हा इतर चार प्रतिज्ञांबाबत आपण तेवढेच गंभीर असू, असे ते म्हणाले.
दुसरी प्रतिज्ञा म्हणजे वसाहतवादी मानसिकता सोडून देणे. जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून भारताच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख करताना ते म्हणाले की शतकानुशतके परकीय दडपशाहीमुळे आत्मविश्वास कमी झाला आहे आणि मर्यादा लादल्या गेल्या आहेत. “आपण भूतकाळातील बंधनांमध्ये जखडून राहता कामा नये तर त्याऐवजी जागतिक आदर्शांना गवसणी घालण्याची आणि महत्त्वाकांक्षी ध्येये निश्चित करण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे,” असे गोयल यांनी सांगितले.
तिसरी प्रतिज्ञा म्हणजे भारताच्या वारशाचा अभिमान बाळगणे. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना भारताचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि मूल्य प्रणाली यांचे खूप महत्त्व आहे. “विकासही आणि वारसाही- आपण विकासाची कास धरली पाहिजे आणि त्याचसोबत आपला वारसाही संवर्धित केला पाहिजे. आपली विविधता ही आपली ताकद आहे आणि आपण आपल्या परंपरांना प्रगतीच्या सामूहिक प्रवासात जोडले पाहिजे,” असे ते म्हणाले.
चौथ्या प्रतिज्ञेबद्दल बोलताना गोयल म्हणाले, देशाची एकता आणि अखंडता आपल्यासाठी सर्वोच्च असली पाहिजे. भारत आणि परदेशातल्या युवांना एकत्र आणण्याच्या आयआयएमयूएनच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती प्रत्येक स्तरावर संवर्धित केली पाहिजे. देशाच्या विकसित राष्ट्र होण्यासाठीच्या प्रवासात ही सामूहिक भावना मूलभूत आहे यावर त्यांनी भर दिला.
पाचवी प्रतिज्ञा म्हणजे १.४ अब्ज भारतीयांचा राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचा सामूहिक संकल्प. सर्व नागरिक जेव्हा एका कुटुंबासारखे, सामायिक जबाबदारी आणि करुणेने एकत्र काम करतील तेव्हाच विकसित भारत उदयास येऊ शकेल यावर गोयल यांनी भर दिला. “आपण उपेक्षित लोकांची काळजी घेतली पाहिजे, वंचितांची काळजी घेतली पाहिजे आणि आपली प्रगती समावेशक आणि शाश्वत होईल याची सुनिश्चिती केली पाहिजे,” असे ते म्हणाले.