शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले – संजय राऊत

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. पण या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले, अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे. त्यानंतर आज(दि.२१) पत्रकारांशी बोलतानाही संजय राऊत यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले कि, हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झाली आहे. या हनी ट्रॅपमुळे १६ ते १७ आमदार आणि चार खासदार भाजपाने आपल्याकडे वळवले. त्यांना सीडी दाखवली जात होती. ईडी, सीबीआय हा प्रकार वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलत आहेत, हे त्यांना माहिती आहे. हनी ट्रॅपच्या सूत्रधार त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे राऊत यांनी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत, तोच या हनी ट्रॅपचा सूत्रधार असल्याचा दावा केला. “या प्रफुल्ल लोढाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत. याची सूत्रं जामनेर, जळगावपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहेत. फडणवीसांनी लोढाचा पेन ड्राईव्ह शोधावा, त्यात भाजपचेही दोन मंत्री सापडतील,” असे आव्हान एक्स पोस्टवरून राऊत यांनी दिले

हे सरकार आधी घटनाबाह्य होते, आता ते अनैतिक झाले आहे,” अशी टीका करत राऊत यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कायद्याची पदवी म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. आडनाव फडणवीस असले तरी संस्कार दिसत नाहीत. काल खासदार सुनील तटकरेंच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली, मंत्र्यांच्या बारमधून महिला सापडतात, पण भाजपच्या महिला नेत्या आता गप्प का आहेत?”पुढे राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. “एकनाथ शिंदेंना भविष्य आहे का? भाजपला आता त्यांचे ओझं झालं आहे,” असे म्हणत त्यांनी या आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, राज्यातील आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. हनी ट्रॅपद्वारे राज्य सरकारशी संबंधित काही गोपनीय माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारने यावर निवेदन करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना, कुठला हनी ट्रॅप आणला ? नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे दिला पाहिजे, असे सांगत ना हनी आहे, ना ट्रॅप. या संदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. कुठल्याही आजी-माजी मंत्र्याचे हनी ट्रॅप नसल्याचेही ते म्हणाले. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात तक्रार होती, ती तिने मागेही घेतली. ज्या व्यक्तीचा आपण वारंवार उल्लेख करताय तो काँग्रेस पक्षाचा माणूस आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech