तिरुवनंतपुरम : मागील एका महिन्यापासून केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर अडकून पडलेले ब्रिटशी ‘रॉयल नेव्ही’ चे लढाऊ विमान एफ-35बी दुरुस्त झाले. आज, मंगळवारी(दि.२२) सकाळी या विमानाने ब्रिटनच्या दिशेने उड्डाण केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाने गेल्या महिन्यात तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले होते. तेव्हापासून या विमानाला दुरुस्त करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एफ-35बी लाइटनिंग लढाऊ विमानाने आज सकाळी 10.50 वाजता उड्डाण केले. तर, सोमवारीच या विमानाला हँगरमधून बाहेर काढून विमानतळाच्या बे मध्ये ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, ब्रिटिश रॉयल नेव्हीचे एफ-35बी लाइटनिंग लढाऊ विमान हे ब्रिटनच्या सर्वात प्रगत स्टील्थ फ्लीटचा भाग आहे. जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असून, याची किंमत ११० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
तांत्रिक बिघाडामुळे १४ जूनपासून हे विमान तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. ब्रिटनमधील विमान अभियंत्यांची एक टीम 6 जुलै रोजी विमान दुरुस्त करण्यासाठी येथे आली होती. याची दुरुस्ती सुमारे एक महिना चालली. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, या विमानाचे भाग सुटे करुन परत नेले जातील. मात्र, आता विमान दुरुस्त झाल्यामुळे आहे तसे परत नेण्यात आले.
यानंतर ब्रिटिश उच्चायुक्तालयाने भारताचे आभार मानत मानले. ब्रिटिश उच्चायोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एफ-३५बी विमान आज रवाना झाले. ६ जुलैपासून तैनात असलेल्या ब्रिटिश अभियांत्रिकी पथकाने दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केली आणि विमानाला पुन्हा सक्रिय सेवेत परत येऊ दिले. दुरुस्ती आणि रिकव्हरी प्रक्रियेदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल यूके खूप आभारी आहे. भारतासोबतची आमची संरक्षण भागीदारी आणखी मजबूत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”