नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर मृतदेहांची ओळख पटवून ती त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र या दरम्यान ब्रिटनमधील दोन पीडित कुटुंबांनी दावा केला आहे की त्यांना चुकीचे मृतदेह मिळाले असून या अवशेषांचे डीएनए त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनएशी जुळले नाहीत.यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश माध्यमांच्या या बातम्यांचा दावा फेटाळून लावला आहे.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणावर ब्रिटिश अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहोत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, “ज्यावेळी हा मुद्दा आमच्या निदर्शनास आला, तेव्हा आम्ही यूकेमधील संबंधित यंत्रणांबरोबर त्वरित काम सुरू केले.”त्यांनी पुढे सांगितले, “विमान अपघातानंतर मृतदेहांची ओळख प्रस्थापित करताना सर्व प्रोटोकॉल्स आणि तांत्रिक गरजा पूर्ण केल्या गेल्या होत्या. सर्व मृतदेह व्यावसायिक आणि सन्माननीय पद्धतीने पाठवले गेले. या संदर्भातील कोणतीही चिंता दूर करण्यासाठी आम्ही यूके अधिकाऱ्यांबरोबर सहकार्य करत आहोत.”
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या नातेवाईकाच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू केली होती, मात्र डीएनए चाचणीत जेव्हा समोर आलं की ताबूतात दुसऱ्याच प्रवाश्याचा मृतदेह आहे, तेव्हा त्यांनी अंतिम संस्काराची योजना रद्द केली. पीडित कुटुंबांचे आरोप आहेत की घटनेनंतर मृतांची डीएनए जुळणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नव्हती, आणि यामुळेच चुकीचे मृतदेह यूकेला पोहोचले. पीडित कुटुंबांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पीडित कुटुंबीयांच्यावतीने वकील जेम्स हीली यांनी दावा केला की, किमान दोन ताबूतांमध्ये चूक झालेली आहे, आणि त्यातील डीएनए त्यांच्या नातेवाईकांशी जुळत नाही. हीली यांनी असेही सांगितले की, सुमारे १२–१३ मृतदेह यूकेला पाठवले गेले होते, आणि त्यापैकी दोन कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे की त्यांना जे अवशेष पाठवले गेले ते त्यांच्या नातेवाईकांचे नाहीत.दरम्यान, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेत एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला. या विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडियन नागरिक प्रवास करत होते.
 
								
				 
					
										
												
				 
	
											 
	
											