मुंबई : पुण्याच्या यवत गावात झालेल्या हिंसाचारानंतर तिथे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, दौंड तहसीलमधील यवत येथे सोशल मीडियावरील एका पोस्टनंतर निर्माण झालेल्या तणावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार, एका बाहेरील व्यक्तीने आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केले होते, ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. नागरिक रस्त्यावर उतरले आणि जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समुदायांचे लोक एकत्र बसून संवाद साधत आहेत आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले, “काही लोक जाणूनबुजून तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटस पोस्ट करतात, पण अशा लोकांवर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल. एखादी सभा किंवा कार्यक्रम झाला म्हणून कोणालाही भडकावू स्टेटस पोस्ट करण्याचा अधिकार मिळतो का? कोणालाही कोणत्याही धर्माविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचा अधिकार नाही.”
मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की, “एखाद्या सार्वजनिक सभेमुळे तणाव निर्माण झाला, हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. सध्या परिसर शांततामय आहे. तसेच हेही पडताळून पाहावे लागेल की संबंधित व्हिडिओ क्लिप त्या घटनेच्या ठिकाणचीच आहे की दुसऱ्या कोणत्या ठिकाणची. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये छेडछाड केलेले व्हिडिओ समोर येतात, म्हणून त्याचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे.” मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करत सांगितले, “कोणीही कायदा हातात घेऊ नये. जर कोणी असं केलं, तर पोलिस त्याच्याविरोधात कठोर कारवाई करतील.”
पुण्याच्या दौंड तहसीलमधील यवत गावात १ ऑगस्ट, शुक्रवारच्या दुपारी सोशल मीडियावर एका पोस्टवरून दोन गटांमध्ये झटापट झाली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर गॅसचे गोळे वापरावे लागले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका समुदायातील युवकाने सोशल मीडियावर कथितपणे आक्षेपार्ह पोस्ट केली, ज्यामुळे दुसऱ्या गटातील काही लोक संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.