मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकार अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियांचे सातत्याने सुलभीकरण करत आहे, जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल. शहरांमध्ये अवयवांची वेळेवर आणि सुरळीत वाहतूक तसेच यशस्वी अवयव प्रत्यारोपण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायने व खतमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेने (एन ओ टी टी ओ) १५ व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त आज येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात सांगितले.
अवयवदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जीवनाची देणगी देणाऱ्या निःस्वार्थ दात्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. उपस्थितांना संबोधित करताना नड्डा म्हणाले की, “अवयवदान हे मानवतेच्या सर्वात उदात्त कार्यांपैकी एक आहे. ज्या जगात वैद्यकीय विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगती केली आहे, त्या जगात अवयवदान हे दुसऱ्या व्यक्तीसाठी दिले जाणारे सर्वात मोठे योगदान आहे.” अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करताना नड्डा म्हणाले की, “अवयव निकामी होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून आरोग्यसेवेवरील ताण वाढत चालला आहे. दरवर्षी हजारो लोक अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत असतात. तातडीची गरज असूनही प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि उपलब्ध दात्यांची संख्या यात लक्षणीय तफावत आढळून येते.” ही तफावत इच्छेच्या अभावामुळे नाही, तर अनेकदा जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजांमुळे निर्माण होणाऱ्या संकोचामुळे आहे.
आपल्याला जागरूकता निर्माण करण्यासाठी, संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दात्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी एक व्यासपीठ देणारा आजचा दिवस महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले. अवयव दानाच्या दिशेने भारताने केलेल्या प्रगतीबद्दलही नड्डा यांनी सांगितले. २०२३ मध्ये आधार-आधारितएन ओ टी टी ओ हे ऑनलाइन प्रतिज्ञेचे संकेतस्थळ सुरू झाल्यापासून, ३.३० लाखांपेक्षा नागरिकांनी अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे, हा सार्वजनिक सहभागातला एक ऐतिहासिक क्षण आहे असे ते म्हणाले. प्रतिज्ञा नोंदणीच्या या वाढलेल्या प्रमाणातून, या सामायिक ध्येयाप्रती नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता आणि समर्पण दिसून येते असे ते म्हणाले. प्रत्यारोपण क्षेत्रातील आपल्या व्यावसायिक तज्ञांच्या अथक समर्पणामुळे, भारताने २०२४ मध्ये १८,९०० पेक्षा जास्त अवयव प्रत्यारोपण करण्याचा एक उल्लेखनीय टप्पा गाठला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यारोपणाच्या बाबतीत ही एका वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असून, २०१३ मध्ये ५,००० पेक्षा कमी प्रत्यारोपण झाले होते, त्या तुलनेत ही एक मोठी झेप असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येच्या बाबतीत भारत अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहितीही त्यांनी दिली. हाताच्या प्रत्यारोपणामध्येही भारताने जगात आघाडी घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. हे यश आपल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया क्षमता आणि वैद्यकीय व्यावसायिक तज्ञांच्या अथक समर्पणाचे प्रतीक असल्याचे नड्डा यांनी अधोरेखित केले.
यावेळी नड्डा यांनी अवयवांची गरज आणि उपलब्ध दात्यांमधील तफावत या समस्येचाही उल्लेख केला . या पार्श्वभूमीवर अधिक व्यापक जागरूकता, अधिक व्यापक सार्वजनिक संवाद, कुटुंबांकडून वेळेत संमती मिळणे तसेच मृत व्यक्तींद्वारे दानाला पाठबळ देण्यासाठी मजबूत व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक अवयव दाता हा एक पडद्यामागचा नायक आहे, त्यांची ही निःस्वार्थी कृती एखाद्याच्या दुःखाला आशेमध्ये आणि हानीचे जीवनदानात रूपांतर करते असे ते म्हणाले. एक व्यक्ती हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि आतडे दान करून ८ लोकांचे प्राण वाचवू शकते. याव्यतिरिक्त, ऊती दानाद्वारे आणखी असंख्य लोकांचे जीवन बदलले जाऊ शकते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.