मुंबई : दादर येथील प्रसिद्ध कबूतर खाण्यावर अखेर मुंबई महानगरपालिकेने आणि पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर माहीम पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल. जे. रोड परिसरात कबुतरांना खाद्य घातल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७० आणि २७१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यावर बंदी घालत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला होता. बंदीनंतरही दादर कबूतर खाण्यातील स्थिती जसाची तशी असल्याचे निदर्शनास आल्यावर न्यायालयाने महापालिकेला गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू करण्यात आली असून, सकाळपासून महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कबूतर खाण्याजवळ तैनात आहेत. तथापि, या कारवाईला स्थानिक नागरिक आणि जीवदया प्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “कबुतरांना खायला मिळालं नाही तर ते रस्त्यावर येतात आणि गाड्यांखाली चिरडून मरतात,” असं स्थानिकांचं म्हणणं आहे. तसेच, एवढ्या रात्री अचानक कारवाई का केली जातेय? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कारवाईदरम्यान कबूतर खान्यावर जाळी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले, मात्र त्यालाही स्थानिकांचा विरोध झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता नागरिक रस्त्यावर उतरले आणि बंदोबस्तासाठी पोलीस पाचारण करावा लागला. नागरिकांनी महापालिका व पोलिसांशी चर्चा करून कबुतरांना सुरक्षित पर्याय उपलब्ध होईपर्यंत कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. स्थानिकांचा आक्षेप असा आहे की, “दादर स्टेशनजवळील फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, मग कबूतर खाण्यावर एवढी घाई का?” सध्या कबूतर खाण्याजवळ पोलीस बंदोबस्त कायम असून, महापालिका आणि पोलिस प्रशासन यामध्ये काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.