नवी दिल्ली : नवी दिल्लीमधील चाणक्यपुरी येथील पोलंड दूतावासाजवळ स्कूटीवरून आलेल्या एका गुन्हेगाराने काँग्रेस महिला खासदार सुधा रामकृष्णन यांची सोन्याची चेन हिसकावलीआणि तो पळून गेला. तामिळनाडूतील दुसऱ्या महिला खासदारासोबत त्या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, संशयित स्कूटी चालक खासदाराजवळ आला आणि गाडीचा वेग कमी करून हा गुन्हा केला. परिसरात गस्त घालणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनाला परिस्थितीची जाणीव झाली आणि ते घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली.
पोलिसांनी पीडित खासदाराला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. पण तामिळनाडू हाऊसने पीसीआर कॉल केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले आणि अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. काँग्रेस खासदार सुधा यांनी ही घटना अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. आणि मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहून राजधानीत वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
तामिळनाडूतील मयिलादुथुराईच्या खासदार सुधा रामकृष्णन यांनी संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज सकाळी सहा वाजता त्या तामिळनाडूच्या दुसऱ्या महिला राज्यसभा खासदारासोबत चालत होत्या.तेव्हा स्कूटीवरून एक हेल्मेट घातलेला व्यक्ती आमच्याकडे आला आणि माझी चेन हिसकावून घेतली. ही घटना पोलिश दूतावासाच्या गेट-३ आणि गेट-४ जवळ सकाळी ६:१५ ते ६:२० च्या सुमारास घडली. त्यांनी लिहिले की, आरोपींनी गळ्यातील चेन ओढताच त्यांच्या मानेला दुखापत झाली.पोलिसांचे म्हणणे आहे की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांनी सांगितले की, मी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. तसेच गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना ईमेलद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. मला आशा आहे की, ते त्याची दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करतील.