गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी – मंत्री मंगलप्रभात लोढा

0

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात अशा वेळी गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी, यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुराव करणार असल्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रांट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.

गणेशोत्सवा दरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. या स्थितीत भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु असणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरु असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे.त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत,अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती.या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे २ दोन हजार नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी म्हाडा, एस. आर. ए. महापालिका आणि रेल्वे सह बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे न मारता जागच्या जागी त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य झाले असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

संक्रमण शिबीर झाल्याशिवाय रहिवाश्याना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये
जनता दरबारात अनेक नागरिकांनी म्हाडा संबंधित पुनर्विकास,दुरुस्ती आणि संक्रमण शिबीर संदर्भात तक्रारी मांडल्या होत्या. अनेकदा नागरिकांना संक्रमण शिबिराची सोय न करता इमारती रिकाम्या करण्यासाठी सी टूच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. या संबंधित रहिवाश्यांची बाजू मंत्री लोढा यांनी ऐकून घेतली.यासंदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजीव जायसवाल यांच्या सोबत लवकरच बैठक घेणार असून संक्रमण शिबीर झाल्याशिवाय रहिवाश्याना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये,अशी सूचना करणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.तसेच संक्रमण शिबीर तयार नसल्यास त्वरित इमारतीची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech