“मुंबई महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकणार!” – राज ठाकरे

0

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट मार्गदर्शन करत मुंबई महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकणार, असा निर्धार व्यक्त करत निवडणुकीची तयारी सुरू करण्याचा आदेश देण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. “मतदार यादी तपासा, त्यावर काम करा. जुने कार्यकर्ते, जे पक्षापासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा सोबत घ्या. कोणत्याही प्रकारचा वाद न करता एकत्र येऊन तयारीला लागा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत पक्षाची ताकद दाखवून दिली. “आपला पक्ष मुंबईत सर्वात बलवान आहे. निवडणुकीत सत्ता आपलीच येणार, हे मी टाळ्यांसाठी सांगत नाही. आत्मविश्वासाने सांगतो,” असे ते म्हणाले.

सामाजिक वावर वाढवण्याचे आवाहन करताना त्यांनी संयम आणि शिस्तीचेही महत्त्व अधोरेखित केले. “विनाकारण कोणाला मारू नका, आधी समजावून सांगा. मराठी शिकण्याची तयारी असेल तर शिकवा. उर्मट वागणाऱ्यांशी वाद घालू नका, पण जर तो उर्मटपणेच वागला, तर मग तशीच भूमिका घ्या. आणि महत्त्वाचे म्हणजे – कोणत्याही प्रसंगाचा व्हिडिओ काढू नका,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. युतीच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “युती करायची की नाही, याचा निर्णय मी घेईन. तुम्ही केवळ पक्षाचं काम पाहा. मी आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही तुमचे मतभेद बाजूला ठेवू शकत नाही का?”

या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले की, पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना, माजी उमेदवारांना, घरी बसलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करा. “ज्यांच्याशी पटत नाही, आवडत नाही – ते सुद्धा आपलेच कार्यकर्ते आहेत. त्यांना विश्वास द्या, सोबत घ्या. आपण एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे,” असे ते म्हणाले. या खेळीमेळीच्या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या सूचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत हात वर करून त्यांना पाठिंबा दर्शवला. आगामी निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरणार असून, एकसंघ कार्यपद्धती आणि जनसंपर्काच्या जोरावर मनसे सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech