चंदीगड : रोहतक येथील सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला बाबा राम रहीम पुन्हा एकदा जेलबाहेर आला आहे. त्याला ४० दिवसांची पॅरोल मंजूर झाली आहे. पॅरोल मंजूर झाल्यानंतर तो मंगळवारी(दि.५) सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात रोहतकच्या सुनारिया जेलमधून सिरसा येथील डेरा मुख्यालयासाठी रवाना झाला. ही त्याची जेलमधून १४ वी वेळ अस्थायी सुटका आहे.त्याआधी, ९ एप्रिल २०२५ रोजी त्याला २१ दिवसांची फर्लो मंजूर झाली होती. माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी कैदी राम रहीमचा वाढदिवस आहे. त्यामुळे सिरसा डेऱ्यात रक्षाबंधननंतर त्याचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
दोन साध्वींच्या लैंगिक शोषण आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम २०१७ पासून रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये २० वर्षांची शिक्षा भोगत आहे.गुरमीतच्या सुटकेची वेळ नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्याची पॅरोल बहुतांश वेळा हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीतील विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आसपासच झाली आहे.गुरमीत राम रहीमला २०२४ मध्ये तीन वेळा जेलबाहेर येण्याची संधी मिळाली होती. या तिन्ही वेळा निवडणुकांशी संबंधित होत्या. यापूर्वी २०२३ मध्येही गुरमीत राम रहीमला तीन वेळा फर्लो किंवा पॅरोलवर जेलबाहेर येण्याची संधी मिळाली होती.
जानेवारीमध्ये, जेव्हा डेराचे माजी प्रमुख शाह सतनाम यांची जयंती होती, त्यावेळी त्याला ४० दिवसांची पॅरोल मिळाली होती. जुलै-ऑगस्टमध्ये, जेव्हा हरियाणामध्ये पंचायत निवडणुका होत होत्या, त्यावेळी त्याला ३० दिवसांची पॅरोल मिळाली होती. २०२५ मध्ये राम रहीम तिसऱ्यांदा जेलबाहेर आला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये त्याला प्रत्येकी २१ दिवसांची फर्लो मिळाली होती. जेलमध्ये एक ठराविक काळ घालवल्यानंतर आणि वर्तणुकीच्या आधारे पॅरोल आणि फर्लो मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाते. मात्र, पॅरोलचा कालावधी शिक्षेत धरला जात नाही, तर फर्लोचा कालावधी शिक्षेमध्ये समाविष्ट केला जातो.