नवी दिल्ली : काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खरे भारतीय कोण हे ठरवू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने लखनऊ न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध सुरू असलेल्या कार्यवाहीला सोमवारी स्थगिती दिल्याने हा वाद सुरू झाला. पण त्याच वेळी ‘जर ते खरे भारतीय असतील तर त्यांनी असे विधान करायला नको होते’ असे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी राहुल गांधींच्या विधानाबाबत होती. जे त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान सैन्याबद्दल केले होते.
प्रियांका वाड्रा यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांना सांगितले की, “मी सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांचा आदर करते, पण खरा भारतीय कोण आहे हे ठरवणे हे त्यांचे काम नाही. विरोधी पक्षनेत्याचे काम सरकारला प्रश्न विचारणे आणि आव्हान देणे आहे.” त्या म्हणाल्या की, त्यांचे भाऊ राहुल गांधी यांना सैन्याबद्दल खूप आदर आहे आणि ते कधीही सैन्याविरुद्ध काहीही बोलू शकत नाहीत.
प्रियांका म्हणाल्या, “राहुल नेहमीच सैन्याचा आदर करतात. त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे.” ९ डिसेंबर २०२२ रोजी ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी सैन्याशी संबंधित विधान केले होते.आणि त्यांच्याविरुद्ध लखनऊ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असला तरी, ‘एक खरा भारतीय असे विधान करणार नाही’ असे म्हणत फटकारले होते.